हिवरखेडा गावात महिलांचा आणि तरुणाचा अवैध धंद्याच्या विरोधात एल्गार,दुकानांची तोडफोड

पोलिस प्रशासन निष्क्रिय ठरल्याचा आरोप; महिलांसह तरुणांनी अवैध दारू विक्रीविरोधात केली तोडफोड

 

हिवरखेडा बु. (ता. जामनेर) प्रतिनिधी : गावात सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीविरोधात संतप्त झालेल्या महिला व तरुणांनी पुढाकार घेत संबंधित ठिकाणी जाऊन दारूचा साठा व साहित्याची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेनंतर गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून गावात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले असून त्याचा परिणाम तरुण पिढीवर होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. अनेक कुटुंबांमध्ये यामुळे वाद निर्माण होत असून काहींचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे.

 

काही दिवसांपूर्वी दारूच्या नशेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. मात्र, दारूबंदी व अवैध विक्री रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रभावी पावले उचलली गेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

 

याच पार्श्वभूमीवर महिलांनी व तरुणांनी एकत्र येत संबंधित ठिकाणी जाऊन तोडफोड केली. यापुढे गावात अवैध दारू विक्री होऊ देणार नाही, असा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला.

 

दरम्यान, ग्रामपंचायत स्तरावर दारूबंदी समिती व तंटामुक्ती समितीची नव्याने निवड करण्यात यावी, यासाठी ग्रामसभा बोलविण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामसभेला सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक तसेच संबंधित पोलिस बीट अधिकारी उपस्थित राहावेत, अशीही मागणी करण्यात आली.

 

घटनेनंतर गावात शांतता असून या प्रकरणात पोलिस प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!