जळगाव : जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचार, लाचखोरी, अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना दिली जाणारी शासकीय कंत्राटे, हितसंबंधांचा संघर्ष तसेच बेरोजगार युवकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.
मनसेच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विभागामध्ये काही अधिकाऱ्यांच्या संगनमतातून भ्रष्टाचार वाढीस लागल्याची भावना जनतेत निर्माण झाली असून, शासकीय कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नुकत्याच समोर आलेल्या लाचखोरी प्रकरणाचा उल्लेख करताना, केवळ एका अधिकाऱ्यावर कारवाई करून प्रकरण संपविण्याऐवजी त्यामागील संपूर्ण साखळीचा शोध घेण्याची आवश्यकता असल्याचे मनसेने म्हटले आहे. संबंधित अधिकारी, मध्यस्थ, कंत्राटदार तसेच लाभार्थी यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच काही अधिकाऱ्यांच्या मुलगा, सून, नातेवाईक अथवा निकटवर्तीयांच्या नावावर शासकीय कंत्राटे मिळवून दिली जात असल्याच्या चर्चांचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. सरकारी पदाचा वापर करून स्वतःच्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ मिळवून दिला जात असेल, तर तो गंभीर स्वरूपाचा हितसंबंधांचा संघर्ष असल्याचे मनसेने नमूद केले आहे. अशा सर्व कंत्राटांची चौकशी करून संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यातील नातेसंबंध, आर्थिक व्यवहार आणि भागीदारीची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली.
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक रोजगार आणि व्यवसायाच्या संधींसाठी संघर्ष करीत असताना काही मोजक्या व्यक्तींनाच सातत्याने शासकीय कंत्राटांचा लाभ मिळत असल्यास हा सामान्य युवकांवरील अन्याय असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. शासकीय कंत्राटे ही कोणाचीही जहागीर नसून सर्व पात्र नागरिकांना समान संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका मनसेने मांडली.
यासोबतच मागील काही वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या कंत्राटांचे स्वतंत्र लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे तसेच निवृत्त न्यायाधीश, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, निवेदन स्वीकारताना निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित गैरप्रकार व लाचखोरी प्रकरणाबाबत अधिकृत तक्रार जळगाव जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सादर करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. संबंधित बाबींची वस्तुनिष्ठ चौकशी होण्यासाठी उपलब्ध पुरावे व माहिती संबंधित यंत्रणेकडे देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची तातडीने निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथाया बेरोजगार युवकांच्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, पंकज चौधरी,भूषण ठाकूर,बादशहा शहा,अमजद खाटीक, यांच्या सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.












Leave a Reply