अनधिकृत बांधकाम हटविण्यास बीएमसीची दिरंगाई

मुंबई(प्रतिनिधी): घाटकोपर पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक 128 मधील हनुमान नगर-भटवाडी परिसरातील एका अनधिकृत बांधकामाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून तक्रारी करूनही बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अनधिकृत बांधकामाबाबत 2013 सालापासून महानगरपालिकेकडे वारंवार लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही संबंधित बांधकाम हटविण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

 

विशेष म्हणजे, एन विभागाच्या वसाहत अधिकाऱ्यांनी 26 ऑक्टोबर 2018 रोजी सादर केलेल्या स्थळ पाहणी अहवालात सदर झोपडी अनधिकृत असल्याचे स्पष्ट नमूद केले होते. त्यानंतर सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम 1971 च्या कलम 3Z-1(4) तसेच 22 जुलै 2014 च्या शासन निर्णयानुसार संबंधित झोपडीधारकाला नोटीसही बजावण्यात आली होती.

 

तथापि, नोटीस देऊनही आजतागायत संबंधित अनधिकृत बांधकाम हटविण्यात आलेले नाही. याशिवाय, मूळ झोपडीधारकाने सदर झोपडी बेकायदेशीररित्या विक्री केल्याची माहिती लेखी अर्जाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

 

मात्र, या प्रकरणात इमारत व कारखाने विभागाकडून नवीन स्थळ पाहणी अहवाल देण्यात आलेला नसून संबंधित विभागांकडून चालढकल केली जात असल्याचेही निर्दशनास येत आहे . त्यामुळे अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांकडून करण्यात येत आहे.

तसेच सर्व प्रकारामुळे प्रशासन भूमाफिया बळ देत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!