माध्यमांवरील बदनामीकारक वृत्तप्रसारणाविरोधात जीवन वाघ यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

जामनेर | येथील रहिवासी जीवन बाबुराव वाघ यांनी लोकमत, सकाळ, TV9 तसेच “शिवस्वराज्य” फेसबुक पेज आणि इतर काही सोशल मीडिया माध्यमांविरोधात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. अप्रमाणित, दिशाभूल करणारे व बदनामीकारक वृत्तप्रसारण करून स्वतःची, मुलीची व संपूर्ण कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

कौटुंबिक वादामुळे त्यांची पत्नी सुमारे दीड वर्षांपासून वेगळी राहत होती व दोघांमध्ये पंचफारकती झालेली होती. त्यानंतर पत्नीच्या वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांशी आपला कोणताही वैवाहिक अथवा कायदेशीर संबंध उरलेला नसतानाही काही माध्यमांनी व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख करून विविध बातम्या, पोस्ट व व्हिडिओ प्रसारित केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या वृत्तप्रसारणामुळे समाजात गैरसमज, अफवा व चुकीची प्रतिमा निर्माण झाली असून विशेषतः त्यांच्या मोठ्या मुलीचा साखरपुडा निश्चित झालेला असताना तिच्या भावी वैवाहिक आयुष्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे कुटुंबाला मानसिक त्रास, सामाजिक अपमान व प्रतिष्ठाहानी सहन करावी लागल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

जीवन वाघ यांनी संबंधित माध्यमांनी बातम्या प्रसारित करण्यापूर्वी तथ्य पडताळणी केली होती का, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित बातम्या, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, लिंक, स्क्रीनशॉट व अन्य डिजिटल पुरावे जतन करून सायबर शाखेमार्फत तपास करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तक्रारीत चौकशीत जाणीवपूर्वक बदनामी, मानसिक छळ अथवा इतर दंडनीय प्रकार झाल्याचे निष्पन्न झाल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून संबंधित संपादक, वार्ताहर, सोशल मीडिया पेज प्रशासक व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

यासोबतच या प्रकरणात करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात देण्याची मागणीही तक्रारदाराने पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!