यावल (प्रतिनिधी)-: समाजात वेगाने वाढणारे व्यसनाधीनतेचे प्रमाण, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि त्यामुळे उध्वस्त होणारी कुटुंब व्यवस्था या पार्श्वभूमीवर समाज प्रबोधनाच्या उद्देशाने ३१ मे रोजी ‘जागतिक तंबाखू निषेध दिना’निमित्त यावल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात यावल तालुका गृह रक्षक दलाच्या (होमगार्ड्स) जवानांनी ‘व्यसनमुक्त भारतासाठी’ सामूहिक शपथ घेतली.
यावल तालुका विधी सेवा समिती आणि यावल वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने, तालुका विधी सेवा समिती, यावलचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश श्री. आर. एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुका गृह रक्षक दलाच्या जवानांसाठी या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी बोलताना प्रमुख वक्ते श्री. शशिकांत वारूळकर म्हणाले की, “इतर व्यसनांच्या तुलनेत आज तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात दिवसेंदिवस चिंताजनक वाढ होत आहे. भारतात यामुळे कर्करोगाचे (कॅन्सर) प्रमाण प्रचंड वाढले असून, दररोज अंदाजे अडीच हजार लोक या व्यसनामुळे प्राणाला मुकतात. एखादा देश बलशाली होण्यासाठी त्या देशातील नागरिक निरोगी आणि सुदृढ असणे अत्यंत गरजेचे आहे.”
जवानांशी संवाद साधताना श्री. वारूळकर यांनी व्यसनांपासून दूर राहण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या. ते म्हणाले, “व्यसनांचा ‘ट्रिगर पॉईंट’ ओळखा. ज्या वेळी व्यसनाची तीव्र तलफ लागते, ती वेळ एखादा चांगला छंद जोपासण्यासाठी वापरा. संगतीचा आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम होत असतो, त्यामुळे व्यसनी मित्रांची संगत टाळा. तसेच नियमित व्यायाम आणि मैदानी खेळांकडे स्वतःला वळवल्यास व्यसनांपासून दूर राहण्यास मोठी मदत होते.”
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद यावल तालुका गृह रक्षक दलाचे समादेशक श्री. विजय जावरे यांनी भूषवले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. कैलास दत्तात्रय लावणे (सेक्शन लीडर) यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी, समांतर विधी सहाय्यक अजय बढे, हेमंत फेगडे तसेच यावल गृह रक्षक दलाचे सीनियर फलटण नायक पंकज, ज्योती सदाशिव बारी आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गृह रक्षक दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.












Leave a Reply