वेरूळमध्ये १६ व्या अतिरुद्र महोत्सवाचा भव्य शुभारंभ; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

वेरूळ(बाबासाहेब दांडगे) येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर महादेवाच्या पावन सान्निध्यात आणि अधिक मासाच्या पवित्र पर्वावर आयोजित करण्यात आलेल्या १६ व्या अतिरुद्र अभिषेक महापूजा महोत्सवाला आज (दि. ५) भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. हरिद्वारहून आणलेल्या पवित्र गंगाजल कलशाच्या भव्य शोभायात्रेने महोत्सवाची सुरुवात होताच संपूर्ण वेरूळ नगरी ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेली.

 

ढोल-ताशांचा गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या शोभायात्रेने धार्मिक उत्साहाचे दर्शन घडविले. गावातील विविध ठिकाणी गंगाजल कलशाचे पूजन करून भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

यानंतर महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणवृंदांच्या उपस्थितीत वैदिक मंत्रोच्चारात श्री घृष्णेश्वर महादेवावर पवित्र गंगाजलाचा अभिषेक करण्यात आला. मंत्रघोष आणि धार्मिक विधींमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

दर तीन वर्षांनी आयोजित करण्यात येणारा हा अतिरुद्र महोत्सव राज्यातील प्रमुख धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानला जातो. यंदाच्या महोत्सवासाठी शेकडो वेदपाठी आणि ऋत्विज उपस्थित असून विविध धार्मिक विधी, रुद्रपाठ, यज्ञ आणि महापूजांचे आयोजन करण्यात आले आहे

.

महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अतिरुद्र समितीचे अध्यक्ष सुमित बाबरेकर, कोषाध्यक्ष राजेंद्र कौशिके, सचिव संकेत विटेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात पार पडत आहे.

अधिक मासाच्या पुण्यकाळात सुरू झालेला हा अतिरुद्र महोत्सव भाविकांसाठी आध्यात्मिक पर्वणी ठरत असून पुढील काही दिवस वेरूळ नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!