जामनेर तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी; लग्नाच्या अवघ्या २० दिवसांत नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका आता जीवघेणा ठरू लागला असून, जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे उष्माघातामुळे एका नवविवाहित तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मोहाडी येथील वैशाली सुनील मोरे (वय २०) या तरुणीला गुरुवारी अचानक उष्माघाताची तीव्र लक्षणे जाणवू लागली. प्रचंड उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे तिची प्रकृती अचानक खालावली. कुटुंबीयांनी तातडीने तिला नेरी येथे प्राथमिक उपचारासाठी  आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वैशालीची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी तिला मृत घोषित करताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

विशेष म्हणजे, वैशालीचा विवाह अवघ्या २० दिवसांपूर्वीच मोठ्या उत्साहात पार पडला होता. लग्नानंतर नव्या संसाराची स्वप्ने रंगवणाऱ्या या तरुणीचा अचानक मृत्यू झाल्याने मोहाडी गावात शोककळा पसरली आहे. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली असून, उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेबाबत चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जामनेर पंचायत समिती चे आरोग्य अधिकारी राजेश सोनवणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!