जामनेर बस स्थानकावर चोरीच्या घटना थांबेना,पोलिसांना चोर सापडेना


सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची वारंवार मागणी; तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष?


जामनेर (सागर लव्हाळे)-: बस स्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून प्रवासी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार मागणी करूनही आजपर्यंत बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, बस स्थानक परिसरात मोबाईल चोरी, पर्स लंपास करणे, सोनसाकळी चोरी,तसेच प्रवाशांच्या सामानावर डल्ला मारण्याच्या घटना वाढत आहेत. मात्र या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था स्थानकावर दिसून येत नाही.विशेष म्हणजे, बस स्थानकावर एकही सुरक्षा रक्षक नियुक्त नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे प्रवाशांना स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतःलाच सांभाळावी लागत आहे.



दरम्यान, अनेक वेळा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करूनही प्रशासनाला निवेदनही देण्यात आले असतानाही  प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. काही नागरिकांनी तर या प्रकरणात बस स्थानकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप करत, मुद्दाम दुर्लक्ष केले जात असल्याची शंका व्यक्त केली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे आणि चोरीच्या घटनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!