जळगावात बांगलादेशी तरुणी अटकेत; आश्रय देणाऱ्यावरही गुन्हा

जळगाव शहरात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात सुरू असलेल्या विशेष शोध मोहिमेदरम्यान शनिपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत एका बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेतले आहे. या तरुणीला भारतात बेकायदेशीरपणे आश्रय दिल्याप्रकरणी जोशी पेठेतील एका व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

 

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार जळगाव शहर व जिल्ह्यात अवैध वास्तव्य करणारे परदेशी नागरिक, बनावट कागदपत्रे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील बाबींची तपासणी करण्यासाठी विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शनिपेठ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

 

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, जोशी पेठ परिसरातील भोई गल्ली येथे एक परदेशी महिला कोणतीही वैध कागदपत्रे नसताना राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत कोणीका राणी शामलचंद्र राय (वय २०, रा. बांगलादेश) ही तरुणी पोलिसांना आढळून आली.

 

तपासादरम्यान संबंधित तरुणीकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही वैध प्रवासी दस्तऐवज, पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक चौकशीत ती अवैध मार्गाने भारतात प्रवेश करून काही दिवसांपासून जळगावमध्ये वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे.

 

या प्रकरणी पोलिसांनी बांगलादेशी तरुणीसह तिला आश्रय देणारा चिन्मय जगन्नाथ वाला (रा. जळगाव, मूळ रा. पश्चिम बंगाल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संबंधित तरुणी बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती असूनही तिला पोलिसांपासून लपवून ठेवणे आणि आश्रय देणे, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

 

सदर प्रकरणात इमिग्रेशन आणि परदेशी नागरिक कायदा २०२५ अंतर्गत कलम २१, ०८ आणि २४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी करीत आहेत.

 

दरम्यान, जळगाव पोलीस दलाकडून शहर आणि जिल्ह्यात संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अवैध वास्तव्य, बनावट कागदपत्रे आणि बेकायदेशीर घुसखोरीविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

नागरिकांनी परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!