भुसावळमध्ये गांजा विक्री रॅकेटचा पर्दाफाश; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त दोघे भाऊ अटकेत

भुसावळ शहरातील ताजनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर गांजा साठवून त्याची विक्री करणाऱ्या रॅकेटचा बाजारपेठ पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल २१ किलो ९७२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत ४ लाख ३९ हजार ४४० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांना ताजनगरातील तडवी वाडा परिसरातील एका घरामध्ये गांजा साठवून त्याची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

त्यानंतर पोलिसांनी संशयित शेख अजिज अब्दुल मजिद ऊर्फ अच्चू (वय ४१) यांच्या घरावर अचानक धाड टाकली. कारवाईदरम्यान घरामध्ये ठेवलेल्या दोन गोण्यांमध्ये संशयास्पद पदार्थ आढळून आला. पोलिसांनी तत्काळ फॉरेन्सिक तपासणी केली असता तो पदार्थ गांजा असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी वजन केल्यानंतर एकूण २१ किलो ९७२ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी शेख अजिज अब्दुल मजिद ऊर्फ अच्चू तसेच त्याचा भाऊ शेख सलीम अब्दुल मजिद (वय ४५) यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!