पिंपरी, ता. १० : देहूरोड परिसरातील तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचे अश्लील व्हिडिओ तयार करत वारंवार अत्याचार करणाऱ्या चौघांना शिवाजीनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच आरोपींवर विविध कलमांन्वये दोष सिद्ध झाल्याने न्यायालयाने कठोर निरीक्षण नोंदवले.

या प्रकरणातील आरोपींमध्ये
१) नोमान ऊर्फ अरबाज जावेद खान (रा. देहूरोड, पुणे)
२) सुलतान ऊर्फ मुश्ताख सलीम सय्यद (रा. देहूरोड, पुणे)
३) रियाज ऊर्फ मन्नान जावेद खान (रा. देहूरोड, पुणे)
४) सोहेल शेरअली पिरझादे (रा. देहूरोड, पुणे)
यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ दरम्यान आरोपींनी संगनमताने पीडित तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केले. तिचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेला मारहाण करून तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. काही आरोपींनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचाही तपासात निष्पन्न झाले.

याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९३/२०२१ दाखल करण्यात आला होता. भारतीय दंड संहिता कलम ३४२, ३७६(१), ३७६(ड), ३७७, ३२३, ५०४, ५०६, १२०(ब), माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त संजय नाईकपाटील यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पाटील यांनी काम पाहिले. वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षींच्या आधारे आरोपींविरोधातील आरोप सिद्ध करण्यात यश आले.

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, विशाल गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे, पोलिस निरीक्षक जगन्नाथ जानकर, उपनिरीक्षक डी. एस. शेळके, उपनिरीक्षक अमृत निंबाळे, महिला पोलिस हवालदार आशा घाटे आणि पोलिस शिपाई सचिन पतुरे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मनोरंजन