वाघोली, ता. १० : पुणे शहरासह ग्रामीण भागात एमडी (मॅफेड्रॉन) अंमली पदार्थाचे जाळे उभे करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा वाघोली पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून २२५ ग्रॅम एमडी अंमली पदार्थासह तब्बल १ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाघोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी रात्री जोगेश्वरी वजनकाटा परिसरात कारवाई करत अनिस शम्मू सय्यद (रा. मांजरी) आणि हरी उत्तम उफाडे (रा. वाघोली) यांना ५ ग्रॅम ५ मिलिग्रॅम एमडी अंमली पदार्थासह ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी सुमित अशोक घुले, प्रतिक उर्फ सोन्याबापू होले आणि ऋषीकेश उर्फ राम यनभर यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सुमित घुले असल्याचे निष्पन्न झाले. तो साथीदार आकाश ढवळे यांच्या मदतीने पुणे शहरासह लोणीकंद, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, कारेगाव, रांजणगाव आणि शिरूर परिसरात एमडीची विक्री करत असल्याची माहिती समोर आली.

तसेच, २०१६ मधील कुरकुंभ ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विपीनकुमार श्रीरामसागर पंडित हा जामिनावर सुटल्यानंतर या टोळीला एमडी तयार करण्यासाठी मदत करत असल्याचेही उघड झाले. ग्रामीण भागात एमडी उत्पादनाचा कारखाना सुरू करण्याचा त्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला.गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी सुमित घुले याला अहमदाबाद येथून अटक केली. त्यानंतर रामनिवास रानुराम बिश्नोई याला खराडी येथून ६३.६२ ग्रॅम एमडीसह पकडण्यात आले. आकाश ढवळे याच्याकडून १५९ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. विपीनकुमार पंडित यालाही हडपसर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत पोलिसांनी बीएमडब्ल्यू, स्विफ्ट, ग्लान्झा अशा महागड्या वाहनांसह मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींचे अंमली पदार्थ तस्करीचे सिंडिकेट उभे करण्याचे मनसुबे पोलिसांनी उधळून लावल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे आणि सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार प्रदीप मोटे, शेखर शिंदे, विशाल गायकवाड, गहीनीनाथ बोयणे, महादेव कुभार आणि राहुल तुपारे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मनोरंजन