पुणे : मोक्का कायद्यान्वये दाखल गंभीर गुन्ह्यांमधील तब्बल आठ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट ३ ने सोलापूर जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. गुरूदत्त गुणाजी साळवे (वय ४४, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोक्का व गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निलेश घायवळ टोळीवरील कोथरूड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र.क्र. २५०/२०२५ व २५१/२०२५ या मोक्का गुन्ह्यांचा तपास सुरू होता. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये गुरूदत्त साळवे हा मागील आठ महिन्यांपासून फरार होता.

युनिट ३ मधील पोलीस अंमलदार संदीप शेळके यांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. आरोपी स्वतःची ओळख लपवून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक रवाना करण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे, पोलीस अंमलदार मारूती पारधी, संदीप शेळके, अतुल साठे व वाघस्कर यांच्या पथकाने सलग दोन दिवस आरोपीचा पाठलाग केला. अखेर निजामपूर (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथून आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपीला सुरक्षितपणे पुण्यात आणून पुढील कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा-१ यांच्यासमोर हजर करण्यात आले. सध्या कोथरूड पोलीस स्टेशनकडून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे तसेच गुन्हे शाखा युनिट ३ मधील अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई यशस्वी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

मनोरंजन