जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथे अवैध दारू विक्रीच्या वाढत्या प्रकारांमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, दारूच्या नशेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, गावातील नागरिकांनी अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी आरोपी अमोल महाजन ()३९याच्याविरोधात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली असून, पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
हिवरखेडा परिसरात खुलेआम सुरू असलेल्या दारू विक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. “गावात अवैध दारू विक्रीला आळा बसला असता तर अशी घटना घडली नसती,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत. पोलिस प्रशासनाने गावातील अवैध दारू विक्रीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.












Leave a Reply