शिक्षकाने विद्येच्या पवित्र मंदिरात एका ९ वर्षांच्या निष्पाप मुलींवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार धरणगाव तालुक्यातील दहिदुल्ले येथे उघडकीस आला आहे.
मागील दोन वर्षांपासून पीडितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षक नंदलाल नारायण मराठे याला धरणगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्याची तक्रार स्वतः पालकमंत्र्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील दहिदुल्ले येथील जिल्हा परिषद शाळेत आरोपी नंदलाल मराठे हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. पीडित बालिका याच शाळेत इयत्ता तिसरीत शिकत असताना १५ जून २०२४ पासून या नराधमाने तिच्यावर नजर ठेवली होती. शाळेची वेळ होण्यापूर्वी सकाळी १० वाजता ‘शाळेत झाडू मारण्यासाठी ये’ असा बहाणा करून त्याने चिमुरडीला एकांतात बोलावून घेतले आणि तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली.
हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही. पीडिता चौथीमध्ये गेल्यानंतरही त्याने हा छळ सुरूच ठेवला. तिला वर्गात बोलावून मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवणे आणि अनैसर्गिक कृत्य करणे असा घृणास्पद प्रकार त्याने वारंवार केला. पीडितेने या कृत्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, तिला चापटा मारून ‘कोणाला काही सांगितले तर तुझे आई-वडील मरून जातील’ अशी भीती घातली. ३० एप्रिल २०२६ रोजी शाळेच्या शेवटच्या दिवशीही या हैवानाने तिच्यावर अत्याचार केला.
सततच्या छळाला कंटाळून आणि दहशतीखाली असलेल्या पीडितेने अखेर हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तातडीने धरणगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी आरोपी नंदलाल मराठे (रा. द्वारका नगर, जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कृषी विभागाच्या बैठकीला आले असताना पालकमंत्र्यांनी धरणगाव पोलीस निरीक्षक यांच्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना तक्रार केली की आरोपीला सन्माननीय वागणूक कस काय देता. यावरून जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले की लवकरच याबाबत चौकशी करून कारवाई करतो












Leave a Reply