जामनेर -: नगर परिषद अंतर्गत सोनबडी येथील जलतरण तलावात चार वर्षीय बालक कार्तिक याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संताप व्यक्त होत असून, संबंधित इंजिनिअर व ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढे आली आहे. याबाबत प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी सोनबडी येथील नगर परिषद जलतरण तलावात सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे कार्तिक या चार वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेला संबंधित ठेकेदार आणि देखरेख करणारे इंजिनिअर जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, यापूर्वीही याच जलतरण तलावात अशाच प्रकारची घटना घडल्याचे सांगण्यात आले असून, त्यावेळी योग्य कारवाई झाली असती तर ही दुर्दैवी घटना टळली असती, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. नगर परिषद प्रशासन संबंधित अधिकारी व ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
निवेदनाद्वारे संबंधित इंजिनिअर व ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून, पीडित कुटुंबाला इंजिनिअर, ठेकेदार आणि नगर परिषद प्रशासनाकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपास करण्यात यावा, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जलतरण तलाव परिसरात अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जामनेर नगर परिषद जलतरण तलाव दुर्घटनेप्रकरणी ठेकेदार आणि इंजिनिअर यांच्या वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी












Leave a Reply