जामनेर : तालुक्यातील मालदाभाडी येथे एसटी बस आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात अवघ्या १६ वर्षीय सार्थक पोकळे या होतकरू युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातामुळे मालदाभाडीसह रोहनखेड परिसरावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेला आणि आईचा एकमेव आधार असलेला सार्थक काळाच्या पडद्याआड गेल्याने नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.मिळालेल्या माहितीनुसार, सार्थक पोकळे हा मूळचा रोहनखेड येथील रहिवासी होता. लहान वयातच त्याच्या वडिलांचे अपघाती निधन झाल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते. त्यानंतर त्याची आई मुलाला घेऊन मामाच्या गावी मालदाभाडी येथे वास्तव्यास आली. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतही आईने कष्टाची पराकाष्ठा करत सार्थकचे संगोपन केले. मुलगा मोठा होऊन चांगले शिक्षण घेईल, नोकरी करेल आणि आयुष्याला आधार देईल, अशी असंख्य स्वप्ने तिने उराशी बाळगली होती. मात्र नियतीने तिची सर्व स्वप्ने एका क्षणात उद्ध्वस्त केली.सार्थक हा स्वभावाने अत्यंत शांत, नम्र, अभ्यासू आणि सर्वांशी आपुलकीने वागणारा होता. गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे त्याच्या अकाली निधनाची बातमी समजताच संपूर्ण परिसरावर दुःखाची छाया पसरली.दरम्यान, मालदाभाडी येथे एसटी बस आणि मोटारसायकलची धडक झाली. या भीषण अपघातात सार्थक गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. सार्थकच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच रोहनखेड आणि मालदाभाडी गावांमध्ये शोककळा पसरली.सार्थक हा आपल्या आईचा एकुलता एक मुलगा आणि तिच्या आयुष्याचा एकमेव आधार होता. आधीच पतीच्या निधनाचे दुःख सहन केलेल्या आईसमोर आता मुलाच्याही निधनाचे असह्य दुःख उभे ठाकले आहे. तिचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. “आईच्या जगण्याचा आधारच नियतीने हिरावून नेला,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून अनेकांनी सार्थकला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पोकळे कुटुंबीयांवर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगाबद्दल नागरिकांकडून सहवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. अवघ्या सोळाव्या वर्षी काळाने सार्थकला हिरावून नेल्याने रोहनखेड व मालदाभाडी परिसरात शोककळा पसरली असून, या दुर्दैवी घटनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
