राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेसाठी जामनेर तालुका सज्ज
जामनेर:- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापटे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यातील बालकांचे आरोग्य सुधारावे त्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ योग्य प्रकारे व्हावे तसेच शरीरातील कृमींचा प्रादुर्भाव कमी व्हावा कुपोषणाचे प्रमाण तसेच रक्ताल्पतेचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने उद्या मंगळवार २७ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेच्या माध्यमातून वय वर्ष एक ते वय वर्ष एकोणीस या वयोगटातील सर्व बालक व किशोरवयीन मुले मुली यांना जंतनाशकाचा डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने शिक्षण विभाग व अंगणवाडी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.
गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग शिक्षण विभाग व महिला बालकल्याण विभाग यांच्या समन्वयातून ही मोहीम राबवण्यात येत आहे.
शहरी भागात २३ हजार ७३४ तर ग्रामीण भागात एक लाख आठ हजार नऊशे एक अशा एकूण एक लाख ३२ हजार ६३५ बालकांना व किशोरवयीन मुला-मुलींना जंतनाशक डोस देण्यात येणार आहे.
आपल्या गावात भागातील अंगणवाडी केंद्र तसेच मराठी शाळा उर्दू शाळा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आश्रम शाळा खाजगी इंग्रजी शाळा या ठिकाणी जंतनाशक औषध उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाचे नोडल टीचर व आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचे जंतनाशक प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे.
सदर मोहिमेस सदर उपजिल्हा रुग्णालय जामनेर चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा, ग्रामीण रुग्णालय पहूर चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नीळकंठ महाजन, गटशिक्षणाधिकारी अनिल दळवी,बालविकास प्रकल्प अधिकारी नर्गिस तडवी,शिला पाटील, दमयंती इंगळे,रत्ना पाटील,यांचे अनमोल सहकार्य लाभले.
सर्व पालकांनी आपल्या बालकाला तसेच किशोरवयीन मुला-मुलींना मंगळवारी जंतनाशक डोस मिळेल याची खात्री करून मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
