जामनेर : सामाजिक बांधिलकी जपत आणि बालशिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने चव्हाण परिवाराच्या वतीने शास्त्रीनगर, जामनेर येथील अंगणवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी खुर्च्या व टेबल सप्रेम भेट देण्यात आले. चि. प्रद्युम्न अमोल चव्हाण हा याच अंगणवाडीतील विद्यार्थी असून, त्याच्या निमित्ताने परिवाराने हा सामाजिक उपक्रम राबविला.
अंगणवाडी हे बालकांच्या शैक्षणिक प्रवासातील पहिले पाऊल असते. या वयात मुलांना शिक्षणासाठी पोषक वातावरण आणि आवश्यक सुविधा मिळणे महत्त्वाचे असते. हीच जाणीव ठेवून चव्हाण परिवाराने अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी खुर्च्या व टेबल भेट देत सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा प्रयत्न केला.
समाजातील लहान मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेले छोटेसे योगदानही महत्त्वपूर्ण ठरू शकते, हा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या प्रसंगी चव्हाण परिवारातील सदस्यांसह साक्षात वानर हनुमान महाराष्ट्र प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
समाजातील गरजा ओळखून आपल्या परीने योगदान देण्याची भावना प्रत्येकाने जोपासल्यास सामाजिक विकासाला निश्चितच हातभार लागेल, अशी भावना या उपक्रमातून व्यक्त झाली.
