जामनेर पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करत एका इसमाला धारदार तलवारीसह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ९ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास जामनेर शहरातील बोदवड रोड परिसरात करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गोविंद महाराज झोपडपट्टी परिसरात एक इसम धारदार तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव भिकन किसन घिसाडी (वय ४२, रा. गोविंद महाराज झोपडपट्टी, जामनेर) असे सांगितले. त्याच्याकडून ३२ इंच लांबीची धारदार तलवार जप्त करण्यात आली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२८/२०२६ नुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. साहिल तडवी, पोहेकॉ. प्रताप मथुरे, पोहेकॉ. सचिन महाजन, पोहेकॉ. राजेश लहासे आणि पोहेकॉ. गजानन माळी यांच्या पथकाने केली.
पोलिसांनी नागरिकांना अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे.
