जामनेर:- स्थानिक उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे आज दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास छातीत तीव्र वेदना (Chest Pain) आणि प्रचंड घाम येत असलेल्या गंभीर अवस्थेत एका ७० वर्षीय वृद्ध रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले.
रुग्णाची नाजूक स्थिती लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालय जामनेरचे फिजिशियन डॉ. धिरल महाजन यांनी विलंब न करता ‘स्टेमी प्रोजेक्ट’ (STEMI Project) अंतर्गत तात्काळ सिरीयल इसीजी (Serial ECG) तपासणी केली. तपासणीअंती रुग्णाला गंभीर स्वरूपाचा ‘अँटेरोलॅटरल एमआय विथ अट्रियल फिब्रिलेशन’ (Anterolateral MI with Atrial Fibrillation) असल्याचे निदान झाले.
‘गोल्डन अवर’चे महत्त्व ओळखून डॉ. धिरल महाजन यांनी त्वरित वैद्यकीय निर्णय घेत Streptokinase इंजेक्शन देऊन रुग्णावर यशस्वी थ्रॉम्बोलिसिस (Thrombolysis) उपचार केले. तसेच हृदयाच्या अनियमित ठोक्यांवर नियंत्रणासाठी Injection Amiodarone देण्यात आले. या वेळी वेळेचे गांभीर्य ओळखून आमचे मित्र डॉ. रमेश पाटील सर यांनी तात्काळ हे इंजेक्शन उपलब्ध करून देऊन मोलाचे सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानण्यात आले. या संयुक्त आणि तत्पर प्रयत्नांमुळे रुग्णाची प्रकृती वैद्यकीयदृष्ट्या स्थिर (Clinically Stabilized) झाली असून, त्यांचा रक्तदाब (BP) आणि हृदयाचे ठोके पूर्ववत सामान्य करण्यात यश आले.
जीवनरक्षक ‘Streptokinase’ इंजेक्शन उपलब्धतेसाठी औषध निर्माण अधिकाऱ्यांचे विशेष योगदान:रुग्णासाठी अत्यंत आवश्यक असलेले जीवनरक्षक इंजेक्शन Streptokinase उपलब्ध व्हावे यासाठी उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथील औषध निर्माण अधिकारी श्री. विजयकुमार वाडेकर सर यांनी अथक परिश्रम व सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. तसेच नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथील औषध निर्माण अधिकारी श्री. कमलेश भाऊ थोरात यांच्या विशेष सहकार्यामुळेच हे इंजेक्शन वेळेवर आपल्याकडे मागवून उपलब्ध करून घेणे शक्य झाले होते. या दोन्ही औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे आणि सहकार्यामुळेच रुग्णाचा जीव वाचवणे शक्य झाल्याने श्री. विजयकुमार वाडेकर सर आणि श्री. कमलेश भाऊ थोरात यांचेही विशेष कौतुक व मनापासून आभार मानण्यात आले.
मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे सर यांचे मार्गदर्शन व पाठपुरावा:
ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांपर्यंत ‘स्टेमी’सारख्या जीवनरक्षक योजनांचा लाभ सर्वसामान्य रुग्णांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे सर यांचे निरंतर मार्गदर्शन, सक्षम पाठपुरावा आणि सहकार्य लाभत असल्यानेच अशा प्रकारची तातडीची व दर्जेदार आरोग्यसेवा देणे शक्य झाले आहे.
या आणीबाणीच्या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय जामनेर मधील सर्व अधिकारी, नर्सिंग स्टाफ आणि कर्मचाऱ्यांचे सक्रिय सहकार्य लाभले. वेळेवर मिळालेल्या या जीवनदानाबद्दल रुग्णाच्या कुटुंबीयांनी सर्व डॉक्टर्स, अधिकारी व आरोग्य पथकाचे मनापासून आभार मानले आहेत.
