लघू पाटबंधारे विभागाच्यावतीने केल्या जाणाऱ्या पाझर तलावच्या कामासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा. या करीता महसूल विभागाचे बनावट कागदपत्रे तयार करून १७ गटातील १५ शेतकऱ्यांनी एकूण ६३ कोटी रुपयांचा वाढीव मोबदला मिळण्याचा दावा न्यायालयात दाखल केला. न्यायालयाच्या नोटीस मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या सतर्कतेतुळे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महसूल विभागाकडून जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली असून रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रक व अटलगाव येथील शेतकऱ्यांची जमीन सन २०१२ मध्ये पाझर तलावासाठी संपादीत करण्यात आली होती. त्यानंतर या जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा, यासाठी १७ गटांमधील १५ शेतकऱ्यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. एकूण ६३ कोटी रुपयांचा हा दावा दाखल करताना शेतकऱ्यांनी महसूल विभागाच्या बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे महसूल विभागाने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. विशेष म्हणजे भूसंपादन अधिकाऱ्यांनी दाखल | केलेल्या दाव्यावर महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे लेटरहेड, शिक्का व इतर कागदपत्रे बनावट तयार करून न्यायालयात दावा दाखल केल्याचे तपासात समोर आले आहे.
शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या दाव्यावर न्यायालयाने महसूल विभागाला त्यांचे म्हणणे (से) सादर करण्यासाठी कळविले. त्यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे आढळले. कागदपत्रांची जुळवाजुळव करून महसूल विभागाने पोलिसांकडे तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार शनिवार दि. ९ मे रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात महसूल विभागाचे अधिकारी पोहचले असून त्यांच्याकडून फिर्याद दिल्यानंतर रात्री उशिरापर्यंत १७वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु होते.