ज्योतिषविद्येच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणारा आणि पतसंस्थांच्या मार्फत कोट्यवधींचा घोटाळा करणारा अशोक खरात सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे. खरातवर दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत. या प्रकरणात पहिल्यापासूनच रुपाली चाकणकरांचं नाव पुढे येत होतं. त्यामुळे आता चाकणकर यांना एसआयटीच्या चौकशीला सामोरं जावं लागत आहे.अशोक खरातचं प्रकरण पुढे आल्यानंतर रुपाली चाकणकर आणि खरातचे फोटो पुढे आले होते. काही फोटोंमध्ये त्या खरातची पाद्यपुजा करताना दिसत होत्या. या प्रकारामुळे चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावं लागतं होतं. याप्रकरणात त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली होती.सआयटीने अखेर रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी बोलावलं आहे. नाशिक येथे त्यांची चौकशी सुरु असून त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत त्यांच्या महिला वकीलदेखील होत्या. आपण तपासकामात सहकार्य करणार असल्याचं चाकणकरांनी स्पष्ट केलं.
काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
”एसआयटीचा तपास सुरु आहे, त्यांचे काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं त्यांना पाहिजे आहेत. मी या तपासामध्ये पूर्णपणे सहकार्य करणार आहे. तपास यंत्रणांना आणि पोलिसांना जी काही मदत लागेल, ती करण्यासाठी मी सहकार्य करेन.” असं त्या म्हणाल्या.
अशोक खरातला पाठिशी घातल्याचा आरोप चाकणकरांवर आहे. त्यावर त्या म्हणाल्या, तुमच्या मनात अनेक शंका आहेत. या प्रकरणाचा तपास जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्याची उत्तरं मिळतील.दरम्यान, दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीसाठी रवाना झाल्या आहेत. त्यांची किती वेळ चौकशी होणार, हे दुपारनंतर कळेलच. पण या प्रकरणत चाकणकर खरंच दोषी आहेत का? त्यांनी खरातला पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला का? याची उत्तरं तपासानंतर मिळतील.