प्राथमिक शाळा, पिचर्डे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘शेतकऱ्यासोबत स्वातंत्र्य दिन’ व ‘वृक्षारोपण मोहीम’ हा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. पी पी एल, विद्यार्थी, पालक, शेतकरी, शिक्षक, शास्त्रज्ञ तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक शेतीचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदनाने झाली. यावेळी उपस्थितांनी ‘जय जवान, जय किसान’ असा जयघोष करत देशसेवा, शेती आणि विज्ञान यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला. देशसेवेतून निवृत्त झालेले माजी सैनिक शिवाजी बोरसे यांचा पारादीप फॉस्फेटस तर्फे सन्मान करण्यात आला.
पारादीप फॉस्फेटस चे मॅनेजर योगेश महाजन यांनी स्मार्ट सोल्युशन, बायो २०, इम्पॅक्ट, TSP ४६%, नॅनो डीएपी बद्दल माहिती दिली.
यानंतर शाळेच्या परिसरात तब्बल २०० आंबा वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वृक्षाला संबंधित विद्यार्थ्याचे नाव आणि त्याच्या वडिलांचे नाव असलेली वृक्षपाटी लावण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ वृक्षारोपणाचा अनुभव मिळाला नाही, तर भविष्यात त्या झाडाची निगा राखण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वृक्षांशी भावनिक नाते निर्माण करून पर्यावरण संवर्धनाची जाणीव रूजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाला पारादीप फॉस्फेटस, जळगाव चे मॅनेजर योगेश महाजन, विज्ञान केंद्र, जळगावचे उद्यानविद्या विषयातील शास्त्रज्ञ प्रा. किरण जाधव, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष दीपक महाजन, मुख्याध्यापक माधव पाटील, शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे भडगाव तालुका कार्याध्यक्ष विनोद बोरसे, सरपंच किरण वैराळे, पोलीस पाटील श्रीमती चेतना पाटील, विकासोचे चेअरमन श्रीराम रामदास पाटील, जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक बोरसे यांच्यासह सर्व संचालक, ग्रामस्थ, केळी उत्पादक शेतकरी, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
एक विद्यार्थी-एक वृक्ष’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबतची जबाबदारी निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी लावलेली ही २०० आंब्याची झाडे भविष्यात शाळेचा परिसर हिरवाईने नटविण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा जिवंत संदेश देणार आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभक्ती, शेतकरी, विज्ञान आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
पिचर्डे येथील या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सहभागाने वृक्षसंवर्धनाची चळवळ रुजविण्याचा प्रयत्न झाला असून, ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ ही संकल्पना भविष्यात शाळेच्या हिरवाईसाठी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श ठरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
