जामनेर -:(सागर लव्हाळे) एसटी आगारातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची नवी कोरी बस चोरून नेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. आगारातून बस बाहेर काढल्यानंतर शहापूर गावाजवळ बसचे टायर पंक्चर झाल्याने चोरट्यांने बस तेथेच सोडून पलायन केल्याचे समोर आले होते. मात्र, या घटनेला 8 दिवस उलटूनही पोलिस प्रशासनाच्या तपासातून अद्याप आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एसटी आगारासारख्या महत्त्वाच्या ठिकाणाहून नवी कोरी बस चोरून नेण्याचा प्रयत्न होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. या घटनेमुळे आगारातील सुरक्षा व्यवस्था तसेच सीसीटीव्ही यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
बस चोरीच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असला, तरी अद्याप या प्रकरणात ठोस प्रगती झाल्याचे दिसून येत नाही. चोरट्यांने बस आगारातून कशी बाहेर काढली? आगारातील सुरक्षा यंत्रणेला याची माहिती का मिळाली नाही? सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांचे छायाचित्र असतानाही चोर अजूनही मिळाला नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
विशेष म्हणजे, एसटी बस चोरीसारखी गंभीर घटना घडूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने “पोलिस प्रशासन निष्फळ ठरत आहे का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा, आगारातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी शोधून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
बस चोरीचा प्रयत्न झाला, बस सापडली; पण चोरटे अजूनही पोलिसांच्या हाती का नाहीत? हा प्रश्न सध्या जामनेरकरांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
