हिवरखेडा : वाघूर धरण परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज केबल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज हिवरखेडा येथे डीवायएसपी बापू रोहम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी व पोलिसांची संयुक्त बैठक पार पडली.बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडताना सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून वाघूर परिसरात शेतातील वीज केबलची मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे. चोरटे केबल कापून नेत असून, काही शेतकऱ्यांनी बसविलेल्या अॅल्युमिनियम वायरही तुकडे करून नुकसान केले जात आहे. या प्रकाराबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करूनही प्रभावी चौकशी किंवा ठोस कारवाई होत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.यावेळी डीवायएसपी बापू रोहम साहेब यांनी शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत, गावातील प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करणे तसेच रात्रीच्या वेळेस पोलिसांची गस्त वाढविण्यात येईल, असे सांगितले. संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती मिळताच पोलीस अल्पावधीत घटनास्थळी पोहोचून आवश्यक कारवाई करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.या बैठकीस पोलीस स्टेशनचे एपीआय शिंदे साहेब, पंचायत समिती सदस्य अमर पाटील, पोलीस पाटील लीलाधर मालखेडे यांच्यासह वाघूर परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि केबल चोरीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
