जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने लहान मुला-मुलींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेत स्वच्छतागृह नसल्यामुळे विद्यार्थ्यांना काही अंतरावरील नदीकाठी जाऊन नैसर्गिक विधी उरकावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नदीला पाणी वाढलेले असून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न पालक आणि ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेमध्ये तातडीने स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ, पालक आणि नागरिकांकडून होत आहे. शिक्षण विभाग आणि संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून स्वच्छतागृहाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
